एकदा हृदयनाथ उर्फ बाळासाहेब मंगेशकर यांना प्रश्न विचारण्यात आला की नको देवराया, अंत आता पाहू या अभंगात बदल करायचा अधिकार तुम्हाला कोणी दिला. बाळासाहेबानी चकित होऊन विचारले तेव्हा कळलं की खऱ्या अभंगामध्ये दुसऱ्या व तिसऱ्या चरणाचे यमक जुळवलेले असते, म्हणजे मूळ अभंग नको देवराया, अंत पाहू आता, प्राण हा सर्वथा, जाऊ पाहे असा असून त्यात चाल देताना एका शब्दाची जागा बदलली गेली. प्रश्न कर्त्याचा रोख त्यावरच होता.
लगेच विचार मनात आला की चला मिळतील तेवढे अभंग तपासून पहावेत. अभंगांची एक ठेवण आहे व जास्तीत जास्त अभंग याच पठडीतले आहेत. कमीत कमी शब्दात आपल्या संतांनी भक्ती, कर्मादी मार्ग मांडले आहेत.
पण त्यात ही एक अभंग असा आहे की ज्यात दुसरे तिसरे चरण यमक जुळलेले आहेच शिवाय पुढच्या कडव्याची सुरवात मागच्या कडव्याच्या शेवटच्या शब्दाने केलेय, वा कसं सुचलं असेल हे?
संत रामदास स्वामींनी लिहिलेला, स्व.राम फाटक यांच्या संगीत दिगदर्शनाखाली स्व. भीमसेन जोशी यांच्या सुमधुर आवाजाने नटलेला हा अभंग केवळ याचसाठी थोडा हटके आहे यात शंका नाही.
आरंभी वंदीन अयोध्येचा राजा । भक्तांचीया काजा पावतसे
पावतसे महासंकटीं निर्वाणीं । रामनाम वाणी उच्चारितां
उच्चारितां राम होय पापक्षय । पुण्याचा निश्चय पुण्यभूमी
पुण्यभूमी पुण्यवंतांसीं आठवे । पापीया नाठवे कांहिं केल्यां
कांहिं केल्यां तुझें मन पालटेना । दास ह्मणे जना सावधान
अशीच थोडी करामत गदिमांनी इंद्रायणी काठी या गीतात केलीय, पहा तुमच्या लक्षात येते का?
Watch आरंभी वंदीन अयोध्येचा राजा..