चित्रपटातील नाट्यगीत...

मराठी हिंदी गाण्यांचे वेड आधी ट्रांझिस्टर व नंतर टेप रेकॉर्डर ने लावले. स्वतःचा टेप रेकॉर्डर घेतल्यानंतर प्रत्येक कॅसेटचे रेकॉर्ड कसे नीट ठेवायचे तेही मनात ठरलेलं होतं, ते प्रत्यक्षात कधीच आले नाही तो भाग वेगळा. 

नंतर कॉम्प्यूटर वर विविध गाणी कॉपी करून ठेवताना मात्र नीट फोल्डर तयार करूनच ठेवली गेली. आवडती हिंदी गाणी हि बरीचशी चित्रपटांतीलच, थोड्याफार गैर फिल्मी गझला. मराठीत मात्र चार फोल्डर - चित्रगीत, नाट्यगीत, भावगीत व भक्तीगीत. मग गाण्याचा प्रकार पाहून त्या त्या फोल्डर मध्ये कॉपी करायचं.

पण काहीवेळा विचार करायला लावणारं गाणं पुढ्यात यायचं. उदा. गदिमा / स्नेहल भाटकर / सुमनताई या त्रिकुटाचं अन्नपूर्णा चित्रपटातील तुझ्या कांतीसम रक्तपताका हे अजरामर गाणं चित्रगीत कि भक्तिगीत असा प्रश्न पडे व त्याचे नेमकं उत्तर सापडत नसे. 

असाच प्रश्न पडायला लावणारं 'मुंबईचा जावई' या चित्रपटातील ग.दि. माडगूळकर यांनी लिहिलेलं, बाबूजींच्या संगीताने नटलेलं व रामदास कामत यांच्या बहारदार पहाडी आवाजातील प्रथम तुज पाहता हे गाणं. चित्रपटातील नायकाचा भाऊ (अरुण सरनाईक ) नाटकात काम करत असतो. देखणे सरनाईक घरच्या प्रेक्षकांसमोर हे नाटकातील गीत सादर करतात म्हणून हे चित्रपटातील अस्सल नाट्यगीत.

साक्षात सरस्वतीचा अंश असलेल्या व प्रसंगानुरुप गीते लिहिण्यात हातखंडा असलेल्या गदिमां कडून अशीच नाट्यगीते लिहून घेता आली असती तर आणखी संगीत नाटके जन्माला आली असती असं उगाचंच वाटून राहतं...

Watch : प्रथम तुज पाहता