गाने गाने पर लिखा...

चित्रपट निर्माते बी.आर.चोप्रांचा १९५७ सालचा नया दौर हा चित्रपट त्यातील गाण्यांसह खूपच गाजला. पण त्याच वेळी काही कारणाने चोप्रा व सुप्रसिद्ध पार्श्वगायक महंमद रफी यांचे संबंध चांगलेच दुरावले व चोप्रांनी आपल्या संगीतकारांना रफी साहेबांना गाणी न देण्याची ताकीदच दिली. 

वक्त चित्रपटातील टायटल साँग व द बर्निंग ट्रेन मधील कव्वाली चा एखाद दुसरा अपवाद वगळता चोप्रांच्या चित्रपटातील बहुतेक गाणी गायचं भाग्य महेंद्र कपूर यांना लाभलं. यामध्ये धूल का फूल, गुमराह, हमराझ, वक्त, धर्मपुत्र, आदमी और इन्सान आदी चित्रपटातील महेंद्र कपूर यांनी गायलेली सर्व गाणी सुद्धा हिटच झाली तो भाग वेगळा. 

सन १९७० च्या आसपास संगीतकार ओ.पी. नय्यर यांनी पण अचानक रफी साहेबांना गाणी देणं बंद केलं व आपल्या पुढल्या कारकिर्दीसाठी महेंद्र कपूर यांनाच आमंत्रित केलं. 

मराठीतील सुपरस्टार दादा कोंडके यांनी देखील पहिल्या एक दोन चित्रपटांनंतर जयवंत कुलकर्णी यांच्या ऐवजी महेन्द्र कपूर यांचाच आवाज पसंत केला, म्हणतात ना गाने गाने पर लिखा है गाने वाले का नाम..

सन १९७२ मध्ये आलेल्या धुंद या चित्रपटातील महेंद्र कपूर यांनी गायलेले असेच एक कोपऱ्यातील गाणं. गीतकार साहिर लुधियानवी यांनी जीवनाचे सार सांगत चित्रपटाच्या टायटलशी जोडत केलेली शब्द रचना केवळ लाजवाब..

ज्ञात पण अज्ञात...

पुतलीबाई नावाचा हिंदी चित्रपट टॉकीजला लागला आणि शेजारी राहणारे दोघे तिघे बॅचलर एकदम खुश झाले, कधी एकदा जाऊन चित्रपट पाहतो असं झालं त्यांना. पहिल्या डाकूराणीच्या जीवनावर आधारीत हा चित्रपट तसा तितपतच पण गाणी मात्र एकदम हिट होती. संगीतकार पण कोणी जय कुमार, तसा अनोळखीच.

मनात आलं की असे अनेक संगीतकार आहेत, ज्यांनी एक दोन चित्रपटांना सुपरहिट संगीत दिलेय, पण दिग्गज संगीतकारांच्या मांदियाळीत नंतर कुठेतरी मागे पडले. गाणी चांगली असूनही काहींचे चित्रपट फारसे चालले नाहीत त्यामुळेही असेल कदाचित..

कसेही असले तरी संगीतकार जय कुमार (की मराठीत जय पार्टे?) यांच्या सारख्या अज्ञात पण गुणी संगीतकारांची आठवण ठेवणं आपलं कर्तव्य आहे. चला तर मग ही यादी बघा..

संगीतकार जय कुमार (पुतली बाई, जान हाजिर है), नाशाद (बारादरी), दान सिंह (माय लव्ह), राम गांगुली (आग), इक्बाल कुरेशी (चा चा चा ), जी एस कोहली (शिकारी), जानी बाबू कव्वाल (नूर महल), रामलाल (सेहरा, गीत गाया पत्थरोंने), दत्ताराम (परवरीश, अब दिली दूर नाहीं),  सोनिक-ओमी (दिल ने फिर याद किया, उमर कैद, ट्रक ड्रायव्हर), गणेश - संगीतकार जोडी लक्ष्मीकांत प्यारेलाल जोडीतील प्यारेलालजींचा भाऊ (ठाकूर जरनेल सिंग), सी. अर्जुन (सुशीला, जय संतोषी मां, कानून और मुजरीम), ब्रिज भूषण (मिलाप), रॉबिन बॅनर्जी (सखी रॉबिन), बाबुल (रेशमी रुमाल, नकली नवाब)..या व्यतिरिक्त सपन जगमोहन, दत्ताराम, गुलाम महंमद, श्रीनाथ अर्थात एस. एन. त्रिपाठी, प्रेम धवन...बरेच असतील ज्यांचंही योगदान विसरता येणार नाही..

यापैकी कोणाचं गाणं इथे घ्यावं असा प्रश्नच आहे. तरीही दोन - तीन गाणी निवडत आहे,  पाहिलं आहे कानून और मुजरीम चित्रपटातील सुरेश वाडकर व उषाताईंनी गायलेलं, असेच एक अज्ञात गीतकार अहमद वासी यांनी लिहिलेलं... दुसरं ट्रक ड्रायव्हर चित्रपटातील इंदिवर यांनी लिहिलेलं, सनिक ओमी यांनी स्वरबद्ध केलेलं आणि लतादीदींनी गायलेलं.. तिसरं गीतकार फारुख कैसर यांनी लिहिलेलं, जी. एस. कोहलीनी स्वरबद्ध केलेलं शिकारी या चित्रपटातील..

 Watch - शाम रंगीन हुवी है. 

                कान्हा रे कान्हा

                तुमको पिया दिल दिया...

एक आगळा वेगळा आवाज...

साधारणतः संगीतकाराचा आवाज चांगला असतो असे मानले जाते आणि बहुतांशी ते खरेही आहे. कित्येकदा असेही म्हटले जाते की रेकॉर्ड झालेलं गाणं संगीतकाराला जसं अपेक्षित असतं त्याच्या पाच दहा टक्के कमीच प्रत्यक्षात उतरत असतं. त्यामुळेच संगीतकार गायकाने गायिलेले गाणे जास्त बहारदार होत असावं.. 

पण एकूणच गायक संगीतकार फार थोडे.. कदाचित अभिनेता / अभिनेत्री यांना सम्यक आवाज असणं महत्त्वाचं असल्याने अशी गाणी योग्य त्या पार्श्वगायकाकडूनच गाऊन घेतली गेेली. त्यामुळेच जिथं पार्श्वगायन हा विषय नसेल तिथं काही संगीतकारांनी आपला आवाज वापरला व  ती गाणी सुध्दा सुपर हिट झाली. अर्थात या सगळ्याला अपवाद आपल्या अण्णांचा नि बाबूजींचा म्हणजेच सी. रामचंद्र नि सुधीर फडके यांचा..

संगीतकार सचिनदादा बर्मन यांनीही थोडीफार गाणी गायिली आहेत. दादांचा आवाजच आगळा वेगळा, खास त्रिपुरा राज्यातून आयात केलेला वाटावा असा. आजचं आपलं दादांचं गाणं त्यांनाच समर्पित..

१९७० सालचा देव आनंदचा प्रेमपुजारी हा चित्रपट थोडा रोमँटिक थोडा सैनिकी खाक्याचा. एकीकडे शोखियोंमे घोला जाए, रंगीला रे चा प्रणय तर दुसरीकडे ताकत वतन की हमसे है असे खडसावणे..

नीरज यांनी लिहिलेलं दादांच्या आवाजातील चित्रपटाचे टायटल साँग मात्र देशप्रेमाचं प्रतीक वाटावं असं. यही वो जमी जिसकी दुनिया दिवानी ओळ तर सारे जहाँ से अच्छा च्या तोडीची..

Watch - प्रेम के पुजारी हम हैं..