पुतलीबाई नावाचा हिंदी चित्रपट टॉकीजला लागला आणि शेजारी राहणारे दोघे तिघे बॅचलर एकदम खुश झाले, कधी एकदा जाऊन चित्रपट पाहतो असं झालं त्यांना. पहिल्या डाकूराणीच्या जीवनावर आधारीत हा चित्रपट तसा तितपतच पण गाणी मात्र एकदम हिट होती. संगीतकार पण कोणी जय कुमार, तसा अनोळखीच.
मनात आलं की असे अनेक संगीतकार आहेत, ज्यांनी एक दोन चित्रपटांना सुपरहिट संगीत दिलेय, पण दिग्गज संगीतकारांच्या मांदियाळीत नंतर कुठेतरी मागे पडले. गाणी चांगली असूनही काहींचे चित्रपट फारसे चालले नाहीत त्यामुळेही असेल कदाचित..
कसेही असले तरी संगीतकार जय कुमार (की मराठीत जय पार्टे?) यांच्या सारख्या अज्ञात पण गुणी संगीतकारांची आठवण ठेवणं आपलं कर्तव्य आहे. चला तर मग ही यादी बघा..
संगीतकार जय कुमार (पुतली बाई, जान हाजिर है), नाशाद (बारादरी), दान सिंह (माय लव्ह), राम गांगुली (आग), इक्बाल कुरेशी (चा चा चा ), जी एस कोहली (शिकारी), जानी बाबू कव्वाल (नूर महल), रामलाल (सेहरा, गीत गाया पत्थरोंने), दत्ताराम (परवरीश, अब दिली दूर नाहीं), सोनिक-ओमी (दिल ने फिर याद किया, उमर कैद, ट्रक ड्रायव्हर), गणेश - संगीतकार जोडी लक्ष्मीकांत प्यारेलाल जोडीतील प्यारेलालजींचा भाऊ (ठाकूर जरनेल सिंग), सी. अर्जुन (सुशीला, जय संतोषी मां, कानून और मुजरीम), ब्रिज भूषण (मिलाप), रॉबिन बॅनर्जी (सखी रॉबिन), बाबुल (रेशमी रुमाल, नकली नवाब)..या व्यतिरिक्त सपन जगमोहन, दत्ताराम, गुलाम महंमद, श्रीनाथ अर्थात एस. एन. त्रिपाठी, प्रेम धवन...बरेच असतील ज्यांचंही योगदान विसरता येणार नाही..
यापैकी कोणाचं गाणं इथे घ्यावं असा प्रश्नच आहे. तरीही दोन - तीन गाणी निवडत आहे, पाहिलं आहे कानून और मुजरीम चित्रपटातील सुरेश वाडकर व उषाताईंनी गायलेलं, असेच एक अज्ञात गीतकार अहमद वासी यांनी लिहिलेलं... दुसरं ट्रक ड्रायव्हर चित्रपटातील इंदिवर यांनी लिहिलेलं, सनिक ओमी यांनी स्वरबद्ध केलेलं आणि लतादीदींनी गायलेलं.. तिसरं गीतकार फारुख कैसर यांनी लिहिलेलं, जी. एस. कोहलीनी स्वरबद्ध केलेलं शिकारी या चित्रपटातील..
Watch - शाम रंगीन हुवी है.