एक आगळा वेगळा आवाज...

साधारणतः संगीतकाराचा आवाज चांगला असतो असे मानले जाते आणि बहुतांशी ते खरेही आहे. कित्येकदा असेही म्हटले जाते की रेकॉर्ड झालेलं गाणं संगीतकाराला जसं अपेक्षित असतं त्याच्या पाच दहा टक्के कमीच प्रत्यक्षात उतरत असतं. त्यामुळेच संगीतकार गायकाने गायिलेले गाणे जास्त बहारदार होत असावं.. 

पण एकूणच गायक संगीतकार फार थोडे.. कदाचित अभिनेता / अभिनेत्री यांना सम्यक आवाज असणं महत्त्वाचं असल्याने अशी गाणी योग्य त्या पार्श्वगायकाकडूनच गाऊन घेतली गेेली. त्यामुळेच जिथं पार्श्वगायन हा विषय नसेल तिथं काही संगीतकारांनी आपला आवाज वापरला व  ती गाणी सुध्दा सुपर हिट झाली. अर्थात या सगळ्याला अपवाद आपल्या अण्णांचा नि बाबूजींचा म्हणजेच सी. रामचंद्र नि सुधीर फडके यांचा..

संगीतकार सचिनदादा बर्मन यांनीही थोडीफार गाणी गायिली आहेत. दादांचा आवाजच आगळा वेगळा, खास त्रिपुरा राज्यातून आयात केलेला वाटावा असा. आजचं आपलं दादांचं गाणं त्यांनाच समर्पित..

१९७० सालचा देव आनंदचा प्रेमपुजारी हा चित्रपट थोडा रोमँटिक थोडा सैनिकी खाक्याचा. एकीकडे शोखियोंमे घोला जाए, रंगीला रे चा प्रणय तर दुसरीकडे ताकत वतन की हमसे है असे खडसावणे..

नीरज यांनी लिहिलेलं दादांच्या आवाजातील चित्रपटाचे टायटल साँग मात्र देशप्रेमाचं प्रतीक वाटावं असं. यही वो जमी जिसकी दुनिया दिवानी ओळ तर सारे जहाँ से अच्छा च्या तोडीची..

Watch - प्रेम के पुजारी हम हैं..