स्वरसम्राज्ञीची आवड

महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे यांची दोन नाटकं मला फार आवडतात एक - तुझे आहे तुजपाशी व दुसरं सुंदर मी होणार..

याच सुंदर मी होणार या नाटकावर आधारित चित्रनिर्माते श्री. वसंतराव जोगळेकर यांनी आज और कल नावाचा सुरेख हिंदी चित्रपट काढला होता. कृष्ण धवल तरीही सर्वोत्तम निर्मितीमूल्ये असलेला १९६३ सालचा हा चित्रपट प्रत्येक मराठी माणसाने एकदा तरी पाहायलाच हवा.

स्वातंत्र्याची पहाट उगवत असतानाची देशातील सामाजिक स्थिती व त्यामुळे विविध राजघराण्यात घडणाऱ्या घटनांवर व माणसांवर प्रकाश टाकणारं नाट्य अत्यंत समर्थपणे मांडताना हळूवार प्रेमाचं दुसरं अंगही खरोखर पाहाण्यासारखंच..

शारीरिक व मानसिकदृष्ट्या पांगळी झालेली राजकुमारी व तिच्यावर अनोख्या पद्धतीने उपचार करू पाहणाऱ्या डॉक्टरची हळूहळू फुलत जाणारी तरल प्रेमकथाही तितकीच अप्रतिम.

या चित्रपटाची आठवण काढण्याचं कारण म्हणजे आपलं आजचं गाणं..लता दीदींच्या आवडत्या निवडक गाण्यांपैकी एक असलेलं..

साहिर लुधियानवी यांचे शब्द, रवि यांचे संगीत व मोहंम्मद रफी यांचा सुरेल आवाज असा योग जुळून आल्यावर कुणालाही गुणगुणावसं वाटावं असं हे गाणं दिदिंबरोबरच रसिकांनाही नक्की आवडेल यात शंकाच नाही.