एक एक दिवा विझताना...

नवीन वर्ष येते, जुने मागं पडतं हा जगाचाच नियम. १९७२-७३ सालही ह्याला कसे अपवाद असणार? आमच्या पिढीचेही प्राथमिक शिक्षण संपून माध्यमिक शिक्षण सुरू होण्याचा तो काळ. 

मराठी हिंदी गाणी कानावर नुकतीच पडायला लागून थोडीफार कळायलाही लागली होती. चित्रपटातील नायक-नायिका,  गायक, गीतकार, संगीतकार म्हणजे काय ते नक्की समजत नव्हते पण कुठं तरी आत पोहोचू लागलं होतं. त्यांची महती कळत नसली तरी नावं कळू लागली होती.

हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज संगीतकार नौशाद, ओपी नय्यर, बर्मनदादा, शंकर जयकिशन, मदनमोहन आदींची इनिंग संपत आली होती तर आरडी, लक्ष्मी-प्यारे, कल्याणजी आनंदजी  भरात येत होते. 

राज कपूरच्या नवरत्न दरबारातील, सिनेसंगीत विश्वावर बरीच वर्षे राज्य केलेले व एसजे नावाने ओळखले जाणारे संगीतकारद्वय शंकर-जयकिशन यांच्या मैत्रीतील बेबनाव थोडा आधीपासूनच सुरु झाला. आधी गीतकार शैलेंद्र, व नंतर जयकिशन यांच्या आकस्मिक (१९७१) निधनानंतर तर शंकर अगदीच एकटे पडले. चित्रपटांना संगीत देत राहिले पण त्यात पूर्वीची नजाकत कुठेतरी कमी पडत गेली. 

तरीही १९७३ सालच्या चोरीचोरी चित्रपटातील गुलशन बावरा यांनी लिहिलेले, मुकेश यांनी स्वर्गीय सूर लावत गायलेले हे गीत या जोडीच्या संगीत वैभवाची साक्ष देते यात काही शंका नाही.