स्वर-सुमन...

डोळे मिटून घ्यावेत, शांतपणे गाणं ऐकत रहावं आणि कान तृप्त व्हावेत... ज्यांचं प्रत्येक गाणं रसिकांना असं मंत्रमुग्ध करतं त्या आपल्या सुमनताई.. हिंदी, मराठी बरोबरच गुजराती, पंजाबी तसेच बंगाली संगीत क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवणाऱ्या सुमनताई.. पूर्वाश्रमीच्या सुमन हेमाडी व रामानंद कल्याणपूर यांच्याशी विवाह झाल्यानंतरच्या सुमन कल्याणपूर. यावर्षीच्या पद्म भूषण पुरस्काराच्या मानकरी सुमनताई..

मराठीत भक्तीगीते व भावगीते या दोन्ही गीत प्रकारात सुमनताईंनी छान रंग भरले. अशोक पत्की, दशरथ पुजारी, कमलाकर भागवत या संगीतकारांकडे त्या खऱ्या अर्थाने रमल्या. केतकीच्या बनी तिथे हे गीत ऐकताना पावसाळा सुरू झाल्याचा भास होतो तर नाम आहे आधी अंती च्या वेळी हात जोडून ब्रह्मानंदी टाळी लागते. ही किमया सुमन ताईंच्या स्वरांची. 

हिंदीमध्येही आघाडीच्या बहुतेक गायक - संगीतकारांबरोबर त्यांनी काम केले. महंमद रफी साहेबांबरोबर त्यांची विशेष जोडी जमली. 

सुमन ताईंच्या असंख्य हिंदी मराठी गाण्यांमधून एक-दोन गाणी निवडणे तसे कठीणच. मराठीतील राम मोरेंनी लिहिलेलं व दशरथ पुजारी यांनी स्वरबध्द केलेलं व हिंदीतील नूरमहल चित्रपटातील जानी बाबू कव्वाल यांनी स्वरसाज चढवलेलं गीत येथे निवडलं आहे..