कुछ दिल ने कहा..

“महाबळेश्वर” - पर्यटनप्रेमी महाराष्ट्राला पडलेले एक सुंदर स्वप्नच. मुंबई, पुण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या या स्वच्छ, सुरक्षित, नितांतसुंदर थंड हवेच्या ठिकाणाचे सिनेमावाल्यांना वेड लागले नसते तरच नवल. 

साधारण सत्तरच्या दशकापर्यंत बहुतेक सिनेमांचे शुटींग येथे होत असे. कृष्णधवल तसेच रंगीत, हिंदी आणि मराठी सिनेमांमधून महाबळेश्वरचे रमणीय दर्शन घडत असे. याच महाबळेश्वरची पार्श्वभूमी लाभलेला, हृषीकेश मुखर्जींच्या दिग्दर्शनाने नटलेला, कैफी आझमिंच्या अप्रतिम गीतांना हेमंतकुमार यांच्या संगीताने नटलेला चित्रपट म्हणजे सन १९६६ चा अनुपमा. 

या चित्रपटातील लतादिदिंनी गायिलेले आणि धर्मेंद्र, शर्मिला टागोरवर चित्रित झालेले कुछ दिलने कहा हे एक अविस्मरणीय गीत. जन्मतःच आई गमावल्यामुळे वडिलांच्या रोषाला कारणीभूत झाल्याचा एक प्रकारचा कॉम्प्लेक्स असलेल्या मुलीचे एकांतातले भावविश्वच या गाण्यात उलगडलेले आहे.

सकाळची प्रसन्न वेळ, सभोवतालचा निसर्ग आणि शर्मिलाच्या अभिनयाबरोबरच दीदींच्या काहीशा कुजबुजत्या स्वरांना हृषिदांनी अत्यंत तरल पद्धतीने चित्रीत करून एका वेगळ्याच उंचीवर नेले आहे.