आगिनफुलं....

आगिनफुलं हा शब्द नक्की कधी ऐकला ते आठवत नाही. पण दिवाळीत फुलबाजी लावल्यावर ज्या छान चांदण्या पडतात त्यांना आम्ही आगिनफुलं म्हणायचो एवढं मात्र आठवतंय..

नंतर वाचनात आलं कि साधी माणसं या चित्रपटातील ऐरणीच्या देवा तुला या सदाबहार गाण्यात गीतकार स्व.जगदीश खेबुडकर यांनी ठिणगी ठिणगी वाहू दे च्या जागी आधी आगिनफुलं वाहू दे अशी शब्द रचना केली होती..

कोल्हापूरस्थित मास्तर म्हणून प्रसिद्ध असलेल्या व पाच दशकांहून जास्त सांगितिक कारकीर्द गाजवलेल्या खेबुडकरांनी तीनशेपेक्षा अधिक मराठी चित्रपटांसाठी गाणी लिहिली.  तत्कालीन बहुतेक संगितकारांशी त्यांचे चांगले सूर जुळले. या बरोबरच त्यांनी पटकथा, संवाद, लघुकथा, नाटके, दूरदर्शन मालिका इ. विपुल प्रमाणात लेखनही केले..

मास्तरांनी आगिनफुलं हा त्यांचा आवडता शब्द कुंकू माझे भाग्याचे चित्रपटातील ज्या गीतात वापरला ते आपलं आजचं असंच एक कोपऱ्यातील गीत. पूर्वी आकाशवाणी मुंबई केंद्रावर कामगारांसाठी या कार्यक्रमात हे हमखास लागायचं. इथे आगिनफुलं चा संदर्भ जरा वेगळा पण फारच विलोभनीय आहे..

जयवंत कुलकर्णी, बकुळ पंडित व साथीदारांसह गायिलेले हे गीत स्वरबद्ध केलंय राम कदम यांनी..

ए भाय जरा..

खरं तर प्यार हुवा इकरार हुवा व ये रात भिगी भिगी या गाण्यांनी राजकपूरचा आवाज म्हणून ओळख निर्माण झाली होती, पण पुढे ए भाय जरा देख के चलो सारखा एखाद दुसरा अपवाद वगळता मुकेशच राजकपूरचा आवाज झाला आणि पद्मश्री, पद्मभूषण व दादासाहेब फाळके पुरस्कार प्राप्त प्रबोध चंद्र उर्फ मन्ना डे यांच्या संगीत करिअर ला नाही म्हटले तरी थोडा ब्रेकच लागला. 

मोजकच मग ते शास्त्रीय धाटणीचे गाणं असो, कव्वाली असो वा एक चतुर नार सारखं उडतं गाणं असो, मन्ना डे यांचं जवळ जवळ प्रत्येक गाणं हिट झालं. हा एक प्रकारचा रेकॉर्डच म्हणावा लागेल. हिंदीतील बहुतेक प्रथितयश संगीतकरांबरोबर मन्ना डेनीं काम केलं. महंमद रफी साहेबांना सुद्धा मन्नाडेंच्या शास्त्रीय गायकीचे विशेष कौतुक होतं. 

आमच्या पिढीला मन्ना डे माहित झाले ते जंजीर मधल्या यारी है ईमान मेरा यार मेरी जिंदगी या गाण्यामुळे. त्या आधी ही ते प्राण, बलराज साहनी यांचा आवाज म्हणून फिट झाले होतेच. ए मेरे प्यारे वतन, ओ मेरी जोहरा जबी, कस्मे वादे प्यार वफा सब, तू प्यार का सागर है ही गाणी म्हणजे मास्टर पीसच.

मराठीत ही मन्ना डे यांच्या वाट्याला चांगली गाणी आली. गदिमांचं सुप्रसिध्द घन घन माला नभी दाटल्या तर अवीटच. अ आ आई म म मका, गोपाळा गोपाळा देवकी नंदन गोपाळा, प्रीत रंगली ग, धुंद आज डोळे सारखी गाणी त्यांनी अजरामर केली. 

आजचं आपलं गाणं सीता और गीता मधील मदारी धर्मेंद्र वर चित्रित केलेलं, आनंद बक्षींच, आर डी बर्मन यांनी स्वरबद्ध केलेलं. जरा तसं कोपऱ्यातलंच..