भजन-भैरवी...

पुरुषाचा आवाज इतका गोड असू शकतो यावर विश्वास बसू नये इतका मधुर पण तितकाच पहाडी आवाज, गायन व पार्श्वगायन या दोन्ही गीत प्रकारांवर हुकूमत, कोणत्याही प्रकारचं गाणं लीलया गाण्याची तयारी, नकली दुनियेत वावरत असूनही लाख माणूस म्हणून ख्याती असलेल्या महंमद रफी साहेबांचं यंदा जन्म शताब्दी वर्ष सुरू झालंय..

सन १९६६/६७ च्या दरम्यानची गोष्ट आहे. तालुक्याच्या गावी सार्वजनिक ठिकाणी नागिन (जुना, मन डोले मेरा तन डोले.. वाला) चित्रपट लागला होता. आजूबाजूच्या आमच्या सारख्या मुलांना सोबत घेऊन घरातील मोठी माणसं चित्रपट बघायला गेलो होतो. रात्रीची वेळ असल्याने चित्रपट सुरू झाल्यानंतर थोड्याच वेळात आम्ही मुलं केव्हाच निद्राधीन झालो. तरीही बैलगाडीतील तो परतीचा प्रवास, छान नितळ चांदणं असूनही नागिन चित्रपट सुरू होण्यापूर्वी लावण्यात आलेल्या गाण्यांपैकी बहारो फूल बरसाओ कानात पक्क रुजून बसलं. नंतर गाणं खऱ्या अर्थाने कळायला लागलं आणि रफी नावाचं गारूड मनावर परिणाम करून गेलं ते आजतागायत. गेली पन्नास वर्षे रफी साहेबांनी गायलेल्या एक-एक गाण्याचा शोध घेणं सुरू आहे, तरी मन भरत नाहीये..

रफी साहेबांच्या आवाजाबाबत गंमतीची बाब म्हणजे त्यांचा गातानाचा आवाज व वैयक्तीक बोलतानाचा खूप वेगळा होता. त्यांचे मुलाखतीतील बोलणे ऐकताना असं वाटत नाही की एवढी विविध प्रकारची गाणी या माणसाने गायली असतील.

त्याचबरोबर रफीसाहेब गाताना माईक पासून बऱ्यापैकी अंतर ठेवून गात असत. तरीही हवा तो इफेक्ट गाण्यात हमखास  उतरत असे. 

दिलीप कुमार, राजेन्द्र कुमार, शम्मी कपूर, राजकुमार यांचा खास आवाज असलेल्या रफी साहेबांनी लहान मोठ्या सर्व अभिनेत्यांना आपल्या सुरेल आवाजाने सारखाच न्याय दिला. अगदी जॉनी वॉकर, मेहमूद सारख्या विनोदी नटांना देखील.. 

हजारो प्रकारची गाणी गाऊन देशभरातील श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणाऱ्या या महान गायकाच्या एका गाण्याची निवड करणं खरंच कठीण आहे. तरीही गोपी या चित्रपटातील राजेंद्र कृष्ण लिखित, कल्याणजी आनंदजीनी स्वरबद्ध केलेल्या भजनाने या लेखमालेची भैरवी करतो.