अवलिया...

तो कोण होता यापेक्षा तो कोण नव्हता हे जास्त संयुक्तिक ठरावं. तो निर्माता होता, दिग्दर्शक होता, तो गीतकार होता, संगीतकार होता, तो गायक होता आणि नायकही होता..

साल १९६९ पर्यंत किशोरकुमार नामक अवलियानं हिंदी चित्रपटसृष्टीत वरील सगळ्या प्रकारात हात पाय मारून झाल्यावर आपला वडिल बंधू अशोककुमार याचा सल्ला शिरोधार्य मानून पार्श्वगायनावर लक्ष्य केंद्रित केलं. त्याच्या सुदैवाने सुपरस्टार होऊ घातलेला राजेश खन्ना देखील त्याचवेळी जरा नवीन आवाजाच्या शोधात होताच. आणि मग जमली नायक - गायक यांची सुपर डुपर हिट जोडी..

फार पूर्वी चित्रपटाचे नायक / नायिका स्वतःच गात असत. नंतर नायक / नायिकेला शोभेल असे गायक / गायिका निवडून त्यांना गाणी दिली जाऊ लागली व पार्श्वगायनाचे पर्व सुरू झाले. पण पार्श्वगायन ही एक वेगळी कला आहे हे प्रथम जाणले लता दीदींनी व महंमद रफी यांनी. मुकेश यांच्या बाबतीत एक ईश्वरी संकेत होऊन, त्यांना राज कपूरचा गळाच म्हटले जाऊ लागले. आशा ताईंनी तर आवाजाचा एक वेगळाच ढंग देऊन ही कला जोपासली. 

पण काही म्हणा, खऱ्या अर्थाने पुरुष पार्श्वगायनाला रंगत आणली ती किशोर कुमारने. आधी स्वतःसाठी व फक्त देवआनंद साठी गाणारा किशोरकुमार सन १९६९ नंतर सर्व नायकांसाठी पार्श्व गायन करू लागला. विशेषतः राजेश खन्ना, संजीव कुमार, शशी कपूर यांच्या साठी किशोरने लावलेला आवाज अगदी ऐकण्या सारखा. दमदार आवाजाच्या अमिताभ साठी सुद्धा खास आवाज. 

आजचं पहिलं गाणं दूर गगन की छांव में मधील सब कुछ किशोर कुमार.. दुसरं संगीतकार चित्रगुप्त यांनी स्वरबद्ध केलेलं मजरुह सुलतानपूरी यांनी लिहिलेलं एक राझ चित्रपटातील.. या अवलियातील संगीतकाराची जाणीव करून देणारं.. पियानोवर चालणारी बोटे आवर्जून पाहण्यासारखी..